घोडेगाव: घोडेगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत तेल्हारा ग्रामीण केंद्र अंतर्गत शिक्षण परिषद संपन्न झाली. या उपक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष कवळे, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख सौ. सीमा टोहरे तसेच तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रा. प्रदीप ढोले उपस्थित होते. सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पाहुण्यांच्या सत्कारानंतर गावातील दानशूर व्यक्तिमत्व प्रा. प्रदीप ढोले यांनी सालबादाप्रमाणे याही वर्षी आपले भाऊ स्वर्गीय विजयकुमार ढोले यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेस पंधराशे लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी भेट दिली. सोबतच मागील शैक्षणिक सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
याच वेळी स्व. मनोहरराव ताथोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजेश ताथोड यांनी शाळेस रोख तीन हजार रुपये मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केले. स्वर्गीय विजयकुमार ढोले यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी ओतप्रोत भरलेली होती. त्यांचाच वसा त्यांची मुले इंजिनीयर अजिंक्य ढोले, इंजिनीयर अभिषेक ढोले आणि परुल ढोले चालवीत आहेत.
**शिक्षण परिषदेचे दुसरे सत्र**
शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रानंतर लगेचच दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली. दुसऱ्या सत्रात शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी प्रा. विकास दामोदर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयावर, सगणे मॅडम यांनी गणित विषयावर, अविनाश भारसाकळे सर यांनी बुद्धिमत्ता चाचणी तर प्रणिता गावंडे मॅडम यांनी मराठी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सोबतच निपुण भारत संदर्भात श्रद्धा भागवत मॅडम, खडसे सर, बुंदे सर, वासनकर सर, गिऱ्हे सर, हिदायत खान सर, मो. सोहेल सर आणि मकसूद सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन केंद्रप्रमुख सौ. टोहरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक दीपक दहि सर यांच्या निर्देशनाखाली करण्यात आले. शिक्षण परिषदेस पाथर्डी, तूदगाव, थार आणि गाडेगाव येथील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश भारसाकळे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विकास दामोदर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Tags
Akola