मुंबई, (वर्ल्ड टाइम्स मराठी) - मुंबईच्या मीरा-भाईंदर भागात मराठी भाषा न बोलल्यामुळे व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेची तुलना भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अमराठी नागरिकांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून मराठी भाषा न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी हा प्रकार पहलगाम हल्ल्याशी जोडत म्हटले की,
"पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंवर गोळ्या झाडल्या गेल्या, आणि इथे भाषेच्या आधारावर निष्पाप हिंदूंना मारहाण होतेय. हे थांबले पाहिजे. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, जबाबदारी आमची आहे. मराठी अस्मितेची चर्चा आम्ही करू, पण अमराठी माणसांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही."
शेलार यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी कडाडून प्रत्युत्तर दिलं.
"पहलगाममध्ये हल्लेखोरांना शिक्षा झाली का? लोकांना त्याचं उत्तर हवं आहे. आणि आता अचानक पहलगाम आठवलं? हे राजकारण बंद केलं पाहिजे," असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही भाजपवर टीका करत म्हटले,
"तुमचा पक्ष सामाजिक संस्था आहे का? संपूर्ण देशात तुम्ही काय करताय, तेच इथेही. आम्ही हिंदीच्या विरोधात नाही. पण आमचं म्हणणं इतकंच होतं की प्राथमिक शिक्षण मराठीतून असावं."
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेलारांवर टीका करत म्हटले,
"राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शेलारांची आठवण जागी झाली. पहलगाम आठवलं. पण जेव्हा ४९ जवान शहीद झाले, तेव्हा गोळ्या झाडणारे सापडले का? हे भाजपचे दुटप्पी धोरण आहे."
मुंबईतल्या भाषावादावरून निर्माण झालेल्या या वादाने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठी अस्मिता आणि अमराठी समाज यामधील तणावाचा हा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या राजकीय प्रचाराचा भाग ठरू शकतो. मात्र, संवेदनशील घटनांची तुलना करून राजकीय हेतू साधण्यावर टीकेची झोड उठत आहे. पुढील काही दिवसांत हे प्रकरण अधिक पेटते की निवळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags
राजनीतिक