खामगांव: तालुक्यातील मौजे अंबिकापुर येथील कायम रहिवाशी असलेल्या सर्वधर्मीय ग्रामस्थांनी नमुना-८ देऊन घरकुलाची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गट विकास अधिकारी खामगांव यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने धडक दिली.
१९६५ पासूनचे रहिवाशी अद्याप वंचित
जवळपास सन १९६५ पासून कायम रहिवाशी असूनही या ग्रामस्थांना अद्यापपर्यंत नमुना-८ देण्यात आला नाही. यामुळे बहुतांश लोकांचे नाव घरकुल यादीत असूनही त्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकलेला नाही. विशेष म्हणजे अंबिकापुर हे गाव अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच हे लोक येथील कायम रहिवाशी असल्याचे पुरावे या ग्रामस्थांकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.
गावाच्या जन्मापूर्वीपासूनचे रहिवासी
सन १९९५ मध्ये चितोडा या गावचे विभाजन होऊन अंबिकापुर हे गाव अस्तित्वात आले. या गावच्या निर्मितीपूर्वीपासून म्हणजे सन १९६५ पासून हे गावकरी याच ठिकाणी कायम स्वरूपी राहत असूनही त्यांना नमुना-८ मिळालेला नाही.
सर्व जातिसमूहांचा एकत्रित आंदोलन
यामुळे सर्व जाती समूहाचे लोक गट विकास अधिकारी खामगांव यांच्या कार्यालयात प्रचंड संख्येने उपस्थित राहून निवेदन सादर केले. "आम्हाला आम्ही राहत असलेल्या १९६५ पूर्वीपासूनच्या जागेचा नमुना-८ देऊन त्वरित घरकुल देण्यात यावे," ही या ग्रामस्थांची मुख्य मागणी या निवेदनात नमूद केलेली आहे.
अनेक अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती
या निवेदनाच्या प्रती माननीय दिलीपकुमार सानंदा (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), उपविभागीय अधिकारी खामगांव, आकाश वासुदेव इंगळे (अध्यक्ष, अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य) आणि सचिव, ग्रामपंचायत कार्यालय अंबिकापुर यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी अंबिकापुर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
बुलढाणा
