महाराष्ट्र: १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर!

महाराष्ट्र: १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर, पण उर्वरित ZP आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी? आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र: १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर
१२ जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर, पण उर्वरित ZP अन् पंचायत समित्यांची निवडणूक कधी? मोठी माहिती समोर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

मुंबई, १३ जानेवारी २०२६ – राज्यातील महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली. आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल.

मात्र, या घोषणेनंतर राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

उर्वरित निवडणुका कधी होणार?

पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्य निवडणूक आयुक्तांनी उर्वरित निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली.

"आम्ही आज १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केली. पण आता उर्वरित ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेत, त्यांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप काही निर्देश दिलेले नाहीत. जेव्हा सर्वोच्च न्यायालय निर्देश देईल, त्यानुसार उर्वरित ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आहेत, त्यांची निवडणूक घेतली जाईल," असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कोणत्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या?

तीन विभागातील १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत:

कोकण विभाग: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

मराठवाडा विभाग: छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर

निवडणूक कार्यक्रम

- अधिसूचना: १६ जानेवारी २०२६
- उमेदवारी अर्ज दाखल: १६ ते २१ जानेवारी २०२६
- अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६
- अर्ज मागे घेणे: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- अंतिम यादी व चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० नंतर)
- मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
- मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजता)

प्रत्येक मतदाराला दोन मतं देणं बंधनकारक

निवडणूक आयुक्तांनी या निवडणुकीतील एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. "जिल्हा परिषदांच्या या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मतं देणं बंधनकारक आहे. त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समितीसाठी द्यावं लागेल. तसेच या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे," असे त्यांनी सांगितले.

राज्यात आधीच अनेक महापालिकांच्या निवडणुका सुरू असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे २०२६ च्या सुरुवातीला राज्याच्या राजकीय वातावरणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे.
थोडे नवीन जरा जुने

संपर्क फ़ॉर्म