सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; विमान अपघातात अजित पवारांच्या निधनानंतर सोपवली जबाबदारी

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; विमान अपघातात अजित पवारांच्या निधनानंतर सोपवली जबाबदारी
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; विमान अपघातात अजित पवारांच्या निधनानंतर सोपवली जबाबदारी

मुंबई | १ फेब्रुवारी २०२६ - महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या घडामोडीत सुनेत्रा पवार यांनी शनिवारी संध्याकाळी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तीन दिवसांपूर्वीच त्यांचे पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'अजित पवार अमर रहे' आणि 'एकच वादा, अजित दादा' अशा घोषणा देत आपल्या नेत्याची आठवण काढली.

शरद पवार अनभिज्ञ; कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर?
अजित पवारांच्या अंत्यविधीच्या वेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले असले तरी, या राजकीय निर्णयामुळे पुन्हा एकदा कुटुंबातील दरी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "या शपथविधीबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती."

खात्यांचे वाटप: अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे
शपथविधीनंतर तासाभरातच सुनेत्रा पवार यांच्याकडे खात्यांचे वाटप करण्यात आले. अजित पवारांकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत, ज्यात राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ या खात्यांचा समावेश आहे. मात्र, अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

येत्या २० दिवसांत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने, राष्ट्रवादीच्या विनंतीवरूनच फडणवीस यांनी अर्थ खाते तात्पुरते सांभाळण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार हे खाते राष्ट्रवादीकडेच राहणार की भाजप ते स्वतःकडे ठेवणार, याचा अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर घेतला जाईल.

राजकीय भविष्य आणि पक्षाची धुरा
सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत.
 नियमानुसार, त्यांना पुढील सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून येणे अनिवार्य आहे. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्या पोटनिवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

पक्षांतर्गत निर्णयांबाबत माहिती देताना अनिल पाटील म्हणाले की, "जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत असल्याने राज्याला स्थैर्याचा संदेश देणे गरजेचे होते, त्यामुळे हा निर्णय घाईत वाटत असला तरी तो काळाची गरज आहे." प्रकाश सोळंके यांच्यासह अनेक आमदारांनी सुनेत्रा पवार यांनी केवळ उपमुख्यमंत्री पदच नव्हे, तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदही भूषवावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
थोडे नवीन जरा जुने

संपर्क फ़ॉर्म