फी समान, पण न्याय असमान! RCC च्या 'फोटॉन बॅच'मागील धक्कादायक सत्य उघड !

समाचार सुनें AI वाचक उपलब्ध है

पुणे, दि. 20 मे 2026 : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या आरसीसी (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरसीसीच्या कारभाराबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे — सर्व विद्यार्थ्यांकडून समान फी घेऊनही केवळ 150 निवडक विद्यार्थ्यांनाच 'VIP' शिक्षणाची सुविधा दिली जात होती.

'फोटॉन बॅच' म्हणजे काय?

मोटेगावकर यांचे राज्यातील 8 मोठ्या शहरांमध्ये कोचिंग क्लासेस असून त्यात 25 ते 30 हजार विद्यार्थी NEET व JEE ची तयारी करत होते. आरसीसीतर्फे एक सामायिक परीक्षा घेतली जायची आणि त्यातील केवळ टॉप 150 विद्यार्थ्यांनाच 'फोटॉन बॅच' किंवा 'प्लॅटिनम बॅच'मध्ये प्रवेश दिला जायचा. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र नियमित बॅचमध्ये ढकलले जायचे.

फोटॉन बॅचमध्ये RCC चे सर्वात अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक शिकवत असत आणि विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यासाठी ते पूर्णवेळ उपलब्ध असत. विशेष म्हणजे, काही विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार या बॅचला थेट शिवराज मोटेगावकर यांचा वैयक्तिक अॅक्सेस असायचा.

याउलट, नियमित बॅचमध्ये एकाच वर्गात 300 पेक्षा जास्त विद्यार्थी कोंबले जायचे. इतक्या मोठ्या संख्येत शिक्षकांचे लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यावर किती असेल, असा सवाल अनेक पालक उपस्थित करायचे.

निकालातील दरी सांगतेच सगळं

आकड्यांमध्ये हा फरक स्पष्टपणे दिसून येतो. फोटॉन बॅचमधील 150 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 60 टक्के विद्यार्थी MBBS साठी पात्र व्हायचे. मात्र नियमित बॅचमध्ये 300 हून अधिक विद्यार्थी असताना त्यातील केवळ 15 ते 20 टक्केच NEET उत्तीर्ण होऊन वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरायचे.

निकाल जाहीर झाल्यावर मोटेगावकर यांच्या जाहिरातींमध्ये आघाडीवर असायचे ते याच फोटॉन बॅचचे विद्यार्थी. पण हे आतलं गणित पालकांना कळत नव्हतं. एखाद्या मुलाने MBBS मिळवला म्हणजे RCC चे शिक्षण उत्तम, असाच समज पालकांत पसरायचा — वास्तवात मात्र यश हे आधीच ठरवून दिलेल्या 150 जणांपुरतेच मर्यादित होते.

नीट पेपरफुटी रॅकेटमधील प्रमुख आरोपी

या प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक जण गुंतल्याचे उघड झाले आहे. निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे NEET प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये होते आणि या प्रकरणाचे मास्टरमाईंड मानले जातात. पुणे मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्र प्राध्यापिका मनीषा मांढरे याही त्याच पॅनेलमध्ये होत्या. नाशिकचा BAMS विद्यार्थी शुभम खैरनार श्रीमंत कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून लाखोंचे व्यवहार करत होता. पुण्यातील ब्युटी पार्लरचालक मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगरचे आयुर्वेद डॉक्टर धनंजय लोखंडे हेही विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पोहोचवण्याच्या साखळीत सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे, RCC च्या 101 प्रश्नांपैकी बहुतेक प्रश्न थेट NEET परीक्षेत आल्याचेही उघड झाले आहे, जे या रॅकेटचे गांभीर्य अधोरेखित करते.

सीबीआयचा तपास सुरू असून या प्रकरणी आणखी अटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
AI मुख्य सारांश