पुणे, दि. 20 मे 2026 : अंधश्रद्धा, फसवणूक आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांखाली अडकलेला वादग्रस्त ढोंगी बाबा अशोक खरात याच्याभोवती आता अंमलबजावणी संचालनालयाचा (ED) फास अधिकच आवळला गेला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खरातला नुकत्याच झालेल्या कोर्ट सुनावणीत न्यायाधीशांनी थेट प्रश्न विचारला असता, तो पहिल्यांदाच कोर्टात बोलला — आणि त्याच्या उत्तराने न्यायाधीश व वकीलही चक्रावून गेले.
ईडीने उघडली खरातच्या गुन्ह्यांची संपूर्ण कुंडली
कोर्टात ईडीच्या वकिलांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांचा सविस्तर पर्दाफाश केला. खरातने स्वतःला 'भगवान शिवाचा अवतार' म्हणवून घेत भोळ्या भाविकांना जादूटोणा व जीव जाण्याची भीती घालून पूजेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळले. हर्षद पोफळे व ललित पोफळे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी कोट्यवधी रुपये घेण्यात आले. दिनेश परब यांच्या तक्रारीनुसार विविध विधींच्या नावाखाली तब्बल ५ कोटींहून अधिक रुपये उकळून खरातने स्वतःसाठी गाड्या विकत घेतल्या, फार्महाऊस उभारले आणि तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डचाही गैरवापर केला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या नावावर तब्बल ६० बँक खाती आढळून आली आहेत, ज्यांत कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाले. त्यातील एका खात्यातून ३२ लाख रुपये त्याने पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यात वळवले. ईडीने आतापर्यंत खरातच्या ७० मालमत्ता शोधून काढल्या असून यातील अनेक मालमत्ता पत्नीच्या नावावर नोंदवल्याचे उघड झाले आहे.
"मला काहीही माहीत नाही" — खरातचे बेजबाबदार उत्तर
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी खरातला थेट विचारले, "तुमच्यावर काय आरोप आहेत ते कळतात का? काही सांगायचे आहे का?" यावर खरातने उत्तर देताना सारे खापर समता पतसंस्थेच्या मॅनेजरवर फोडण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, पैसे वेगवेगळ्या खात्यांत ठेवण्याचा सल्ला मॅनेजरनेच दिला होता आणि त्यानुसारच आपण वागलो.
मात्र जेव्हा न्यायाधीशांनी विचारले, "त्या ६० खात्यांवर तुम्हीच नॉमिनी आणि तुमचाच मोबाईल नंबर का?" — यावर खरात केवळ एवढेच म्हणाला, "त्याबद्दल मला काहीही माहीत नाही. तपास झाला, आता मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढंच मला माहीत आहे." हे उत्तर ऐकून कोर्टातील सर्वच उपस्थित थक्क झाले.
ईडीच्या तयारीवर न्यायाधीशांची नाराजी
सुनावणीच्या सुरुवातीला ईडीने ७ दिवसांची कोठडी मागितली, मात्र तपास अधिकारी प्रकरणाचे गांभीर्य व कोठडीची नेमकी कारणे नीट मांडू शकले नाहीत. यावर न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, "तपास अधिकाऱ्यांना स्वतःलाच प्रकरण नीट सांगता येत नाही, तर मी कसे समजावून सांगणार?" त्यानंतर वकिलांनी तातडीने कागदपत्रे हाती घेत कोठडीची ठोस कारणे मांडली.
अखेर न्यायालयाने खरातला २६ मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली. या कालावधीत ईडी खरातच्या ६० बँक खात्यांतील पैशांचा स्रोत आणि ७० मालमत्तांचे जाळे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
महिलांशी गैरवर्तन व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास सध्या एसआयटीकडून स्वतंत्रपणे सुरू असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.