| मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे (MDP) विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे |
बुलढाणा, दि. 18 मे 2026 : जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे अवैध बायोडिझेल पंपाविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस उलटला, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अधिकच उफाळून आला आहे.
मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे (MDP) विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. संबंधित बायोडिझेल पंपावर आवश्यक परवानग्यांचा अभाव, NOC मधील त्रुटी, तसेच शासन महसूल व GST चे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. इनामदार यांनी यापूर्वी माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे व पुरावे प्रशासनासमोर सादर करून अनेकवेळा तक्रारी व निवेदने दिली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन हलले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एवढ्यावरच न थांबता आंदोलनकर्त्यांनी एक गंभीर प्रश्नही उपस्थित केला आहे — वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्याने संबंधित पंप मालकांना प्रशासकीय संरक्षण मिळत आहे का? काही अधिकारी व संबंधितांमध्ये मिलीभगत असल्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
आंदोलनकर्त्यांनी चार ठोस मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. संबंधित अवैध बायोडिझेल पंप तातडीने व कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, शासन महसूल व GST च्या नुकसानीची वसुली करण्यात यावी, जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासून आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
इनामदार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही आणि गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करेल.